जागतिक चहा दिवस :
"एक कप चहा मिळेल का?" ही फक्त विचारणा नसते. ती असते प्रेमाची साद, संवादाची सुरुवात, आणि नात्यांचा गोडवा अनुभवण्याची निमित्तमात्र संधी. दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघटना अन्न आणि कृषी द्वारे २१ मे रोजी जगभरात साजरा होणारा ‘जागतिक चहा दिवस’ हा फक्त एका पेयाचा उत्सव नाही, तर एका संस्कृतीचा, आठवणींचा, आणि स्नेहाच्या धाग्याचा गौरव आहे. चहा केवळ थकवा घालवणारा पेय नाही, तर तो सामाजिक संवादाचा, बंध बांधण्याचा आणि एकत्र येण्याचा सुगंधी सेतू आहे.आंतरराष्ट्रीय चहा दिनाचे उद्दिष्ट जगभरात चहाच्या दीर्घ इतिहासाबद्दल आणि खोल सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. चहाचे शाश्वत उत्पादन आणि वापरासाठी उपक्रम राबविण्यासाठी सामूहिक कृतींना प्रोत्साहन देणे आणि प्रोत्साहन देणे आणि भूक आणि गरिबीशी लढण्यासाठी त्याचे महत्त्व जाणून घेणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
चहाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. चीनमध्ये इ.स.पूर्व २७३७ मध्ये सम्राट शेन नुंग यांनी चहाचा शोध लावला, असं मानलं जातं. त्या काळात चहा औषधी म्हणून वापरला जात होता. नंतर तो जपान, कोरिया, आणि मग युरोप व भारत येथे पोहचला.ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात चहाचा प्रसार ‘स्वादासाठी’ नव्हे तर ‘व्यापारासाठी’ केला. त्यांनी आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरी या भागात चहाचे मळे उभारले आणि भारतीय मजुरांना चहा पिकवण्यासाठी कामाला लावले. सुरुवातीला भारतीयांनी चहा नाकारला, पण पुढे चहात साखर, दूध आणि मसाला मिसळून देण्याची पद्धत आली आणि भारतीयांच्या रोजच्या आयुष्यात तो घट्ट रुळला.
आज भारत जगातील सर्वाधिक चहा उत्पादक आणि उपभोक्ता देश आहे. उत्तर भारतातील कुल्हडमधील मसाला चहा असो वा दक्षिण भारतातील सुगंधी डेकोक्शन चहा प्रत्येक भागात वेगळ्या रूपात दिसतो. चहा म्हणजे सकाळचा ऊर्जादायक पहिला घोट, संध्याकाळी दमलेल्या मनाला दिलासा देणारी उब, आणि पावसाच्या थेंबांत गूंजणारा गोडवा!
भारतीय रेल्वे आणि चहाचं नातं म्हणजे प्रवासातील अनोखा अध्याय. रेल्वे प्लॅटफॉर्मवर सकाळीच "चाय... चाय..." करत चालणारे विक्रेते म्हणजे एक nostalgi चा भाग बनले आहेत. लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांनी कुल्हडमध्ये चहा देण्याची योजना सुरु केली या निर्णयामागे पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण आर्थिक सशक्तीकरण हे उद्दिष्ट होते. त्या काळात "कुल्हड वाली चाय" ही फक्त चव नाही, तर 'भारतीय अस्मिता' बनली.
चहा फक्त एक पेय नसून. तो अनेक गोष्टी सांगतो – संवाद सुरू झाला करतो, कट्टी मिटवतो, आठवणी जागवतो, नवीन मैत्री घडवतो. त्यात आहे विश्रांती, प्रेम, प्रेरणा आणि अनेकदा कविता देखील.
कुटुंबातला गप्पांचा अड्डा, मित्रांची हास्यकळा, कवितेचा कार्यक्रम, चर्चेचा वादविवाद सर्व काही चहाशिवाय अपूर्ण! "चहा झाला की सांगतो", "ये गप्पा मारू, पण आधी चहा घेऊ", अशा कितीतरी वाक्यांमध्ये चहा ही 'मैफिलीची भाषा' झालेली असते.
"सकाळ झाली रे झाली, पण चहा नसेल तर ती सकाळच नाही वाटत!" प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात एक गरम कप चहाने होते. ऑफिसला निघताना, पेपर वाचताना, देवपूजा करताना चहा आपली जागा सोडत नाही.
भारतामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पेय म्हणजे चहा. राजकारणी असो, लेखक असो, शेतकरी असो वा विद्यार्थी , प्रत्येकाच्या जगण्यात चहा एका विश्रांतीचा क्षण देतो. विविध प्रकारांचा अनुभव घेणाऱ्या भारतीय जनतेने चहाला 'घरचा' केला आहे.
चहा कधी राग मावळवतो, कधी प्रेम फुलवतो, तर कधी नवं नातं जोडतो.
Comments
Post a Comment