विराट कोहलीची निवृत्ती ;एक ‘विराट’ पर्व
१३ मे २०२५.भारतीय क्रिकेटसाठी ही तारीख इतिहासात कोरली जाईल. विराट कोहली, नावातच आवेश असलेला, ज्याच्या बॅटने हजारो स्वप्नं जागी केली, ज्याच्या झुंजार नजरेने लाखो तरुणांना जिंकण्याची प्रेरणा दिली त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ही केवळ एका खेळाडूची निवृत्ती नव्हे, तर एक विचार, एक युग, आणि एक चैतन्यशील झंझावात संपुष्टात आल्याची नोंद होती.
विराट कोहली म्हणजे मैदानावरचं आक्रमण, आणि मैदानाबाहेरचं सात्त्विक नेतृत्व. २०११ साली वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या या दिल्लीच्या तरुणाने, १४ वर्षांत भारतासाठी १२३ कसोटी सामन्यांत ९,२३० धावा ठोकल्या, ३० शतकं आणि ७ डबल शतकांनी जगाला दाद देण्यास भाग पाडलं. पण आकड्यांपलीकडे त्याची खरी किंमत आहे , भारतीय क्रिकेटमध्ये नवसंस्कृती निर्माण करणारा खेळाडू.
धोनीनंतर कर्णधारपद स्वीकारताना त्याच्यावर जबाबदाऱ्यांचं डोंगर होतं. पण कोहलीने ही भूमिका केवळ यशस्वीरित्या निभावली नाही, तर तेजगती गोलंदाजांवर आधारित भारतीय संघाची पुनर्रचना केली. बुमराह, शमी, सिराजसारख्या गोलंदाजांना नवा आत्मविश्वास मिळवून दिला. ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. ‘आक्रमकता म्हणजे अभिमान नाही, तर आत्मविश्वास’ हे त्याने दाखवून दिलं.
त्याची 'कव्हर ड्राइव्ह' ही फक्त क्रिकेट शॉट नव्हती ;ती होती भारतीय अस्मितेची कलात्मक अभिव्यक्ती. त्याचा प्रत्येक चौकार, त्याची प्रत्येक साजेशी विकेटमागची आरोळी, ही फक्त जल्लोष नव्हती ती होती संघासाठी जीव ओतणाऱ्या योद्ध्याची हाक.
निवृत्तीच्या घोषणेत त्याने लिहिलं , "कसोटी क्रिकेटने मला घडवलं." ही कबुली त्या खेळाच्या मूळ तत्वांना आदर देणाऱ्या खेळाडूची होती. आज जेव्हा टी-२० आणि व्यावसायिक लीग्सच्या झगमगाटात कसोटी क्रिकेट मागे पडतंय, तेव्हा विराटसारखा खेळाडू त्याचा एकनिष्ठ पूजक ठरतो.गेल्या वर्षी त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता वन डे क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय राहणार असला, तरी कसोटी क्रिकेटमधील विराट युग समाप्त झालं आहे. त्याच्या निवृत्तीनंतर, भारतीय संघासमोर नेतृत्वातला शिस्तप्रिय आणि प्रेरक चेहरा पुन्हा उभा करणे ही मोठी जबाबदारी असेल.
आज तो खेळाडू म्हणून बाजूला होतोय, पण मार्गदर्शक म्हणून, प्रेरणास्थान म्हणून, क्रिकेटमधील शुद्धतेचा वाहक म्हणून तो कायम लक्षात राहील. खेळाप्रती असलेली श्रद्धा, मैदानावरचा आक्रमक पण मर्यादित स्वभाव, आणि संघभावनेसाठी केलेलं समर्पण ही त्याच्या वारशाची शिदोरी आहे.भारतीय क्रिकेटने एक बॅट हरवली नाही एक विचार, एक दृष्टिकोन, आणि एक ‘विराट’ मनगट हरवलं आहे.
विराट, निवृत्त झालास, पण तुझ्या खेळींचं तेज आमच्या आठवणीत कायम झळकत राहील.
Nice
ReplyDelete