Skip to main content

विराट कोहलीची निवृत्ती; विराट कसोटी पर्व..

विराट कोहलीची निवृत्ती ;एक ‘विराट’ पर्व

१३ मे २०२५.भारतीय क्रिकेटसाठी ही तारीख इतिहासात कोरली जाईल. विराट कोहली, नावातच आवेश असलेला, ज्याच्या बॅटने हजारो स्वप्नं जागी केली, ज्याच्या झुंजार नजरेने लाखो तरुणांना जिंकण्याची प्रेरणा दिली  त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ही केवळ एका खेळाडूची निवृत्ती नव्हे, तर एक विचार, एक युग, आणि एक चैतन्यशील झंझावात संपुष्टात आल्याची नोंद होती.
विराट कोहली म्हणजे मैदानावरचं आक्रमण, आणि मैदानाबाहेरचं सात्त्विक नेतृत्व. २०११ साली वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या या दिल्लीच्या तरुणाने, १४ वर्षांत भारतासाठी १२३ कसोटी सामन्यांत ९,२३० धावा ठोकल्या, ३० शतकं आणि ७ डबल शतकांनी जगाला दाद देण्यास भाग पाडलं. पण आकड्यांपलीकडे त्याची खरी किंमत आहे , भारतीय क्रिकेटमध्ये नवसंस्कृती निर्माण करणारा खेळाडू.
धोनीनंतर कर्णधारपद स्वीकारताना त्याच्यावर जबाबदाऱ्यांचं डोंगर होतं. पण कोहलीने ही भूमिका केवळ यशस्वीरित्या निभावली नाही, तर तेजगती गोलंदाजांवर आधारित भारतीय संघाची पुनर्रचना केली. बुमराह, शमी, सिराजसारख्या गोलंदाजांना नवा आत्मविश्वास मिळवून दिला. ऑस्ट्रेलियात दोन वेळा कसोटी मालिका जिंकणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला. ‘आक्रमकता म्हणजे अभिमान नाही, तर आत्मविश्वास’ हे त्याने दाखवून दिलं.
त्याची 'कव्हर ड्राइव्ह' ही फक्त क्रिकेट शॉट नव्हती ;ती होती भारतीय अस्मितेची कलात्मक अभिव्यक्ती. त्याचा प्रत्येक चौकार, त्याची प्रत्येक साजेशी विकेटमागची आरोळी, ही फक्त जल्लोष नव्हती ती होती संघासाठी जीव ओतणाऱ्या योद्ध्याची हाक.
निवृत्तीच्या घोषणेत त्याने लिहिलं , "कसोटी क्रिकेटने मला घडवलं." ही कबुली त्या खेळाच्या मूळ तत्वांना आदर देणाऱ्या खेळाडूची होती. आज जेव्हा टी-२० आणि व्यावसायिक लीग्सच्या झगमगाटात कसोटी क्रिकेट मागे पडतंय, तेव्हा विराटसारखा खेळाडू त्याचा एकनिष्ठ पूजक ठरतो.गेल्या वर्षी त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता वन डे क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सक्रिय राहणार असला, तरी कसोटी क्रिकेटमधील विराट युग समाप्त झालं आहे. त्याच्या निवृत्तीनंतर, भारतीय संघासमोर नेतृत्वातला शिस्तप्रिय आणि प्रेरक चेहरा पुन्हा उभा करणे ही मोठी जबाबदारी असेल.
आज तो खेळाडू म्हणून बाजूला होतोय, पण मार्गदर्शक म्हणून, प्रेरणास्थान म्हणून, क्रिकेटमधील शुद्धतेचा वाहक म्हणून तो कायम लक्षात राहील. खेळाप्रती असलेली श्रद्धा, मैदानावरचा आक्रमक पण मर्यादित स्वभाव, आणि संघभावनेसाठी केलेलं समर्पण  ही त्याच्या वारशाची शिदोरी आहे.भारतीय क्रिकेटने एक बॅट हरवली नाही  एक विचार, एक दृष्टिकोन, आणि एक ‘विराट’ मनगट हरवलं आहे.
विराट,  निवृत्त झालास, पण तुझ्या खेळींचं तेज आमच्या आठवणीत कायम झळकत राहील.
कसोटी मैदानाच्या सीमारेषेपलीकडे आता तू जीवनाच्या दुसऱ्या डावात उतरतो आहेस , तसंच यश, तसंच तेज, आणि तसंच विराटपण!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

संच मान्यता 2024 जिल्हा परिषद अमरावती..

शिक्षण हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे माध्यम आहे, जर शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत ढाचा खचायला लागला, तर त्या समाजाचं भवितव्यही ढवळून निघते. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार अमरावती जिल्ह्यात संच मान्यता; एक एप्रिल 2025 पासून लागू झाल्यानंतर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.  प्राथमिक शिक्षणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या योजनेमुळे प्रत्यक्षात शाळा बंद होण्याची वेळ आली आहे, शिक्षक "अतिरिक्त" ठरवले जात आहेत आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात येत आहे. संच मान्यता म्हणजे जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील शाळांचे प्रशासकीय आणि शैक्षणिक पुनर्रचना ते सध्या आधार व्हेरिफाइड करीत आहेत. शिक्षकांची संख्या  विद्यार्थी पटसंख्येप्रमाणे निश्चित केली जाते, ज्यामुळे प्रशासकीय सुलभता,शिक्षकांचे कार्यक्षम नियोजन आणि  गुणवत्तेच्या दृष्टीने प्रयत्न,(PTR ) हे उद्दिष्ट चांगले असले तरी प्रत्यक्षात संच मान्यता अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या विरोधात जाताना दिसते. अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत मराठी आणि उर्दू  शाळा संख्या: 1548 केंद्रशाळा संख्या: 139 आहेत. संचमान्यता 2023-24 न...

पटसंख्या घटल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात 35 शिक्षक निलंबित...

पटसंख्या घटल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात ३५ शिक्षक निलंबित . जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे आणि शिक्षकांच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर आढळून आल्यामुळे जिल्हा परिषदेने कठोर निर्णय घेत १० दिवसांत तब्बल ३५ शिक्षकांना निलंबित केले आहे. शिक्षण उपसंचालक गुलाबराव खरत यांनी यासंदर्भातील कार्यवाही करत स्पष्ट केले की, शाळांमधील घटती पटसंख्या, गुणवत्तेतील घसरण आणि जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करणे आवश्यक बनले होते. ही कारवाई शिक्षण विभागाकडून 'अकार्यक्षम शिक्षक शोध मोहीम' अंतर्गत करण्यात आली असून यात विशेष समित्या नियुक्त करून निरीक्षण व चौकशी केली गेली. निरीक्षणात हे स्पष्ट झाले की अनेक शाळांमध्ये शिक्षक शाळेत उपस्थित राहूनही अध्यापन कार्य करत नाहीत. विद्यार्थ्यांची उपस्थिती खालावली असून इयत्ता ५वी व ८वीच्या मूल्यमापन परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांचे अत्यंत कमी गुण दिसून आले. शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ३५ शिक्षकांची सेवा निलंबित करण्यात आली आहे. यामध्ये मलकापुर, शेगाव, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडर...

संचमान्यता 2024

संचमान्यता 2024 : ग्रामीण शिक्षणावर आलेले संकट. भारताचे संविधान बालकांना शिक्षणाचा मूलभूत हक्क देतो. ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act)’ हे विधिनियम स्पष्टपणे सांगते की, प्रत्येक 6 ते 14 वयोगटातील मुलांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि समतामूलक शिक्षण मिळालंच पाहिजे. महाराष्ट्र शासनाने त्यानुसार ‘महाराष्ट्र शिक्षण हक्क नियम, 2011’ तयार करून शिक्षण व्यवस्थेची अंमलबजावणी सुरु केली. त्यात मुलांच्या अंशतः संख्येवरून शाळा बंद करणे, शिक्षक कमी करणे हे अजिबात अपेक्षित नव्हते. याउलट, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) हे अधिक गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि शिकण्यावर आधारित शिक्षणाच्या दिशेने पाऊल टाकणारे धोरण आहे. पण याच्या अगदी विरुद्ध, 1एप्रिल 2025 मध्ये "संचमान्यता 2024" ही शासनाद्वारे निर्धारित करण्यात आली. यात 15 मार्च 2024 चा शासन निर्णय (जी.आर.) निकष म्हणून वापरला गेला. पण या निकषांचा वापर करताना शासनाने शाळेतील वास्तव, ग्रामीण भागातील परिस्थिती आणि शैक्षणिक गुणवत्ता याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसते. एक शिक्षक 14 ...